केवळ भौतिकतेने मनुष्य सुखी होणार नाही: बाबा गुरबचन सिंह जी

ईश्वराला विसरुन जो भौतिक पदार्थांत गुंतून गेला आहे, या पदार्थांनाच सुखाचा आधार मानतो आहे, त्याचं खाणं-पिणं, कपडा-लत्ता कितीही भारी असलं तरी ते सारं सुख बेकार आहे. धिकार करण्यायोग्य आहे. आपले वडील आपलं पालनपोषण करतात, देखभाल करतात, शिकवतात, आधार देतात आणि आपण मोठे झाल्यावर त्यांच्याशी जर विचित्र वागायला लागलो, स्वत: मौजमजा केली आणि पित्याला विसरुन गेलो तर मनाला शांती-समाधान मिळणारच नाही.

मनातूनएकच आवाज पुन्हा पुन्हा येईल – किती कृतघ्न आहेस रे तू, किती स्वार्थी आहेस? केवळ आपल्या अप्पलपोटपणापायी स्वार्थ साधायचा म्हणून ज्यानं तुझं सगळं काही केलं, सगळं सगळं तुलादिलं, त्या स्वत:च्या जन्मदात्या पित्यालाच विसरुन गेलास? साऱ्या जगाकडूनही हेच धिक्कार करणारे शब्द मिळतील, पाणउतारा करणारी मुक्ताफळं ऐकायला मिळतील. सगळी सगळी सुखसाधनं असूनही आपल्याला अस्वस्थ वाटत राहिल.

याच प्रमाणे जो दातार प्रभूवर प्रेम करत नाही, त्याच्याविषयी श्रद्धा बाळगत नाही, ईश्वरीय सिद्धान्तांनामानत नाही, सृष्टीच्या निर्मात्याचे, प्रभूचे आभार मानत नाही, याचे स्मरण करत नाही तो सुखी होणं केवळ अशक्य आहे. त्याला वाटत असलेलं सुख-समाधान एखाद्या स्वप्नासारखं क्षणिक आहे.  ज्याप्रमाणे एका नवविवाहितेपाशी श्रृंगारासाठी लागणारी सगळी साधनं, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. आता ती जर त्या साधनांतच गुंतून बसली, साज-श्रृंगार करत राहिली, त्यातच गुंतून गेली आणि ज्याने ही सुखसाधनं दिली, साजश्रृंगार बहाल केले त्या दाता असलेल्या पतीची कदरच केली नाही, पर्वा केली नाही, त्याचं स्मरणच ठेवलं नाही, तर तिला पती असल्याचं सुख कदापि लाभणार नाही.

तद्वतच जो या दातार प्रभूचा होऊन जातो, जो या दातारला वरतो, आपला धनी म्हणून स्वीकारतो त्यालाच आनंदधन मिळतं. त्याची प्रशंसा केली जाते, त्याच्याच नावाचा जयघोष केला जातो. पण दातार प्रभूपासून दुरावलेला माणूस या आनंदाचा वाटेकरी होणार नाही. त्याच्या जीवनात ही शोभा, हा आनंद असणार नाही.

जर हीच माया प्रभु परमात्म्याच्या मर्जीनुसार वापरली तर त्यापासून खचितच सुखप्राप्ती होते. ती सुखाचे कारण बनते.  अशाप्रकारे उपयोग केल्याने आपले जीवन आनंदाने ओतप्रोत भरते. समजाएका धन्याने आपल्या नोकराला दहा हजाराचे इनाम दिले. त्या नोकराने ते सारे पैसे आपला आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना मेजवानी देण्यासाठी उधळले, सगळेजण त्याचे अभिनंदन करतात, त्याची खूप प्रशंसा होते, वाहवा होते आणि तो सांगतो सुद्धा – हे पहा, माझ्या मालकांनी हे दहा हजार रुपये मला बक्षिसापोटी दिले आहेत.

थोडक्यात, जागोजागी त्याचा जयजयकार होतोय.  याउलट जर दुसऱ्या नोकाराने दहा हजार रुपये लुटले, हडप केले, चोरले तर तो इतक्या धीटपणाने, प्रकटपणे सांगणार नाही आणि त्याच्या मित्रमंडळीत त्याचा मान-सन्मान राहणार नाही. त्याच्या मनात सारखी एकच भीती राहील की, या मायेच्या तपासासाठी पोलीस माझ्या घरावर छापा तर घालणार नाहीत ना? दरवाजावर जराशी टकटक झाली तरी तो घाबरुन जातो.

आलंय कुणीतरी माझ्या घराची झडती घ्यायला.  रात्रीच्या वेळी झोप लागली की, त्याला स्वप्न पडू लागतात. तो कोर्टात उभा आहे, त्याला शिक्षा सुनावली जातेय. क्षणोक्षणी हाचदेखावा, हाच विचार त्याला भंडावून सोडत असतो. यावरुनएकच गोष्ट स्पष्ट होते की, जे योग्य मार्गाने मिळालं आहे, जे धनी-मालक प्रभू दातारच्या इच्छेनुरुप प्राप्त झालंय, तेच सुखाला कारणीभूत ठरतं.

याउलट जे चुकीच्या वाईट मार्गाने मिळालंय, त्याला चारी बाजूंनी काळजीने, उद्विग्नतेने-अस्वस्थतेने वेढून टाकलंय. कुठलीही गोष्ट योग्य प्रकारे प्राप्त करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे दातार प्रभूला समर्पित होऊन, जगातला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक गोष्ट याचीच जाणून, समजून त्याच्या इच्छेनुसार त्यांचा उपयोग करणे. मग काय आनंदच आनंद!  दोन्ही हातात लाडू असण्यासारखं आहे हे. प्रभूची आज्ञाही मानली आणि सांसारिक पदार्थांची चणचणही उरली नाही.

अनेक प्रकारची पातकं करुन जमवलेली माया ही केवळ दु:खाला कारणीभूत होत असते.  ती पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी असते. बुडबुडा कसा वर तरंगताना दिसतो, पण बघता बघता फुटून जातो. म्हणून फसवाफसवी, कपटीपणा करुन दुसऱ्यांच्या हक्कांवर घाला घालून त्यांच्या सुखाला मूठमाती देऊन स्वत:ची तुमडी भरु नये.

 संत महात्मा आणि पीर-पैगंबरांनी ज्याप्रकारे पराकोटीचे श्रम करुन स्वत:च्या मेहनतीने राजीरोटी कमावली, आपल्या दैनंदिन गरजा भागवल्या, त्याचप्रकारे आपणही कर्म करायचे आहे, कमाई करायची आहे. हीच संतांची रीत आहे. ते कोणावरही आपला भार टाकत नाहीत. आणि म्हणूनच ते जगताचं कल्याण करु शकले. असं जीवनक्रमण करण्यानेच जगात आपली शोभा वृद्धिंगत होते, अन्य मार्गे नाही.

– ‘गुरुवचन’ पुस्तकातून साभार
– प्रस्तुति – स.वि.लव्हटे (मुंबई) 

Sushil Kumar Josh

"उत्तराखण्ड जोश" एक न्यूज पोर्टल है जो अपने पाठकों को देश-विदेश, सरकारी, अर्धसरकारी, सामाजिक गतिविधियां, स्वस्थ्य, मनोरजंन, स्पोर्टस, फिल्मी, कहानी, कविता, व्यंग्य इत्यादि समाचार सोशल मीडिया के जरिये आप तक पहुंचाने का कार्य करता है। वहीं अन्य लोगों तक पहुंचाने या शेयर करने लिए आपका सहयोग चाहता है।

Leave a Reply