मुंबई में साकार दर्शन देकर भक्तों को सद्गुरु ने किया निहाल; 52वां संत समागम महाराष्ट्रा में संपन्न

ईश्वरीय ज्ञान प्राप्त करुन मनुष्य जीवनाचे सार्थक करा: सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे प्रतिपादन महाराष्ट्राचा 52वां वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न

नवी मुंबई। मनुष्य जीवनात येऊन ब्रह्मानुभूतीद्वारे आत्मानुभूती प्राप्त करुन दया, करुणा, प्रेम, नम्रता, सहनशीलता यांसारख्या दिव्य गुणांनी युक्त होऊन आपले जीवन सार्थक करावे.

आपण कोण आहोत, कोठून आलो आणि कुठे जायचे आहे या प्रश्नांची उत्तरे ब्रह्मज्ञानाद्वारेच मिळू शकतात आणि तेव्हाच जीवन सहज-सुंदर बनू शकते, जीवनात स्थिरता येऊ शकते असे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले.

महाराष्ट्राच्या 52व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तिसर्या दिवशी सायंकाळी उपस्थित लाखोंच्या विशाल जनसागराला संबोधित करताना त्या बोलत होत्या. खारघर येथील सिडकोच्या विशाल मैदानांवर दिनांक 25 ते 27 जानेवारी, 2019 या कालावधीत हा संत समागम संपन्न झाला.

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांतून लाखोंच्या संख्येने भाविक-भक्तगणांनी या संत समागमात भाग घेतला. विदेशातूनही शेकडो प्रतिनिधी या संत समागमात सहभागी झाले होते.

सद्गुरु माताजी म्हणाल्या की, ब्रह्मज्ञान हीच संत निरंकारी मिशनची विशेषता असून हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय मनुष्य जीवन सफल मानला जाऊ शकत नाही. हे ज्ञान इतके श्रेष्ठ आहे की, ते प्राप्त केल्यानंतर शंका-कुशंकांना वावच उरत नाही. प्रत्येकाने हे ज्ञान सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे.

माता सविंदरजींना श्रद्धांजली

हा संत समागम मिशनच्या यापूर्वीच्या प्रमुख माता सविंदर हरदेवजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी व त्यांना श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी समर्पित होता. त्याअनुषंगाने समागमाच्या समापन सत्रामध्ये एक संगीतमय श्रद्धांजली समारोह आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये माता सविंदरजी यांच्या जीवनातील अनेक पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच त्यांच्या जीवन व शिकवणूकीवर आधारित एक डॉक्युमेंटरीही सादर करण्यात आली.

तिसर्या दिवसाच्या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या बहुभाषी कवी संमेलनाचा विषयदेखिल “माता सविंदरजींनी करुनी दिव्य प्रवास, जीवन जगण्याची कला शिकवली आम्हांस” असा होता. या विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी, भोजपुरी, पंजाबी इत्यादी भाषांतील सुमारे 15 कविंनी काव्यपाठ केला.

समागमाचा प्रारंभ

समागमाच्या पहिल्या दिवशी दुपारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे समागम स्थळी आगमन झाले. त्यावेळी समागम कमिटीचे समन्वयक तथा मुंबईचे क्षेत्रीय प्रभारी श्री.भूपेंद्र सिंह चुघ यांनी पुष्पगुच्छ देऊन मुंबई क्षेत्राच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत केले.

त्यानंतर सद्गुरु माताजी एका खुल्या वाहनामध्ये विराजमान झाल्या आणि त्यांना एका रंगीबेरंगी शोभायात्रेच्या रुपात समागमाच्या मुख्य मंचाकडे नेण्यात आले. मुख्य मंचाजवळ सद्गुरु माताजींचे आगमन होताच समागमामध्ये आलेल्या समस्त भक्तगणांच्या वतीने समागम कमिटीचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर सत्संगाचे खुले सत्र सुरु झाले. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज मुख्य मंचावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी मानवतेच्या नावे संदेश देऊन समागमाचे विधिवत उद्घाटन केले. सद्गुरु माताजी म्हणाल्या की, सर्व मानवमात्र ही एका ईश्वराचीच लेकरे समजून सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे यासाठीच ईश्वराने मानवाची निर्मिती केली आहे.

आमच्यामध्ये अनेक उणिवा असूनही ईश्वर आपल्यावर प्रेम करत असतो त्याच पद्धतीने आपणही इतरांचे गुण-अवगुण विचारात न घेता सर्वांशी प्रेम केले पाहिजे. आपल्यामध्ये भाषा, प्रांत, संस्कृती इत्यादिंची विभिन्नता आहे यात काहीच संशय नाही, तथापि, या मुद्यांवरुन कोणीही वेगळेपणाचा भाव घेऊ नये. आपण निसर्गाकडूनच विविधतेत एकतेचा भाव शिकायला हवा ज्याच्यामध्ये एका बाजुला सुंदर नंदनवने आहेत तर दुसर्या बाजुला विशाल वाळवंटे आणि पर्वतरांगा तरीही त्यांचे संतुलन कायम आहे.

सद्गुरु माताजींनी सांगितले की, आपण विभिन्न रंगाच्या फुलांसारखे जीवन जगावे ज्यांना एकत्र गुंफल्यानंतर सुंदर हार तयार होतो. सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, आपण ईश्वराला जाणून सहज-सुंदर व मुक्त जीवन जगावे. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही ईश्वरीय ज्ञानापासून वंचित आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच आपण हा ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरवून अज्ञानरुपी अंधार दूर करायचा आहे, असे त्या म्हणाल्या.

सेवादल रॅली

Nirankari Satguru Mata Sudhikcha Ji Maharajसमागमाच्या दुसर्या दिवसाचा प्रारंभ रंगीबेरंगी आणि रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. सेवादलाच्या हजारो पुरुष व महिला स्वयंसेवकांनी या रॅलीमध्ये आपापल्या गणवेषामध्ये भाग घेतला. शारीरिक तंदुरुस्ती व सहयोगाची भावना अंगी बाणवण्यासाठी त्यांनी काही खेळ, मल्लखांब तसेच मानवाकृति मनोरे सादर केले. तसेच अनुशासन, शिस्त, समर्पण भावना इत्यादींची प्रेरणा देणारे काही सांस्कृतिक कार्यक्रमही या रॅलीमध्ये सादर केले गेले.

सेवादल रॅलीला आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, सेवादल स्वयंसेवक आपल्या विविध प्रकारच्या सेवा केवळ समागमामध्येच नव्हे तर इतरत्रही त्यांना जिथे जिथे सांगितले जाईल तिथे तिथे अनुशासनबद्ध राहून, समर्पित भावनेने आणि सजगतेने देत असतात. सेवादल स्वयंसेवक सदैव मिशन आणि समाजाचीच नव्हे तर संपूर्ण मानवतेची सेवा करण्यामध्ये तत्पर असतात असे माताजी म्हणाल्या.

सेवादल रॅलीनंतर सत्संगाच्या खुल्या सत्रामध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की,ज्याप्रमाणे पक्ष्याला आकाशात भरारी घेण्यासाठी दोन पंखांची गरज असते तद्वत जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक कृतीला ईश्वरीय ज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे.

ईश्वरीय ज्ञानाने जीवनात दया, नम्रता, विशालता, त्याग यांसारख्या दिव्य गुणांचा उगम होतो ज्यायोगे जीवन उज्ज्वल बनून इतरांसाठी आदर्शवत ठरते.सर्वांभूती ईश्वराचे रुप पाहत असल्याने त्याच्या मनातील समस्त भेदभाव नाहीसे होतात आणि तो सर्वांशी प्रेमाने वागू लागतो व सर्वांचा आदर करतो.

सद्गुरु माताजींनी सांगितले की, आपण पवित्र धर्मग्रंथांचे व तत्वज्ञानाचे वाचन किंवा पठण करतो आणि ते उत्तमच आहे. तथापि, त्यातील वचनांचा खरा अर्थ समजण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे.

निरंकारी भक्तगणांना आवाहन करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, ज्याप्रमाणे भक्कम पायावर उभारलेली इमारत दीर्घकाळ टिकून राहते तद्वत निरंकारी भक्तांनी सत्यज्ञानावर सदृढ होऊन अज्ञानरुपी अंधार दूर करण्यासाठी झटावे, जेणेकरुन जगामध्ये विविधतेत एकता तसेच सद्भावपूर्ण एकत्वाची भावना साकार होऊ शकेल.

या संत समागमासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या भाविक-भक्तगंणांच्या राहण्याची सोय समागम स्थळावर करण्यात आली होती. तसेच त्यांना मुंबईतील विविध रेल्वे स्थानके व विमानतळ येथून घेऊन येण्यासाठी व समागम संपल्यानंतर पुन्हा त्या त्या स्थानकांवर सोडण्यासाठी मोफत बसेसची व्यवस्था समागम कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. समागम स्थळावरच रेल्वे रिझर्वेशन व तिकीटासाठी विशेष काऊंटरची व्यवस्था करण्यात आली होती.

एनएमएमटी, एसटी व बेस्ट उपक्रमांनी आवश्यकतेनुसार भाविकांच्या सोईसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली होती. समागमामध्ये आलेल्या लाखो भाविकांच्या मोफत भोजनाची व्यवस्था समागम स्थळावर करण्यात आली होती. याशिवाय ४ कॅन्टीनद्वारे भाविकांना मिनरल वॉटर तसेच चहा व खाद्यपदार्थ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आले होते.

मिशनचा इतिहास, विचारधारा आणि बालयुवावर्गाला सकारात्मक दिशा प्रदान करणार्या विविध प्रदर्शनी समागम स्थळावर लावण्यात आल्या होत्या. मिशनच्या प्रकाशन विभागाने सात ठिकाणी आपले स्टॉल लावले होते ज्यामध्ये अत्यल्प दरात मिशनचे साहित्य, डायरी, कॅलेंडर, फोटो इ. सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती.

समागमामध्ये “ब्रह्मज्ञान” या विषयावर एक विशेषांकही प्रकाशित करण्यात आला.ईश्वरीय ज्ञानाची प्राप्ती करु इच्छिणार्या जिज्ञासूंना समागम स्थळावरच ज्ञान प्रदान कक्ष उभारण्यात आला होता ज्यामध्ये तीन दिवसांत हजारो जिज्ञासूंनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली.

समागमाचे भव्य-दिव्य रुप आणि भक्तीभावाने परिपूर्ण वातावरण पाहून येणारा प्रत्येक मनुष्य प्रभावित झाल्याशिवाय राहत नव्हता. हा समागम म्हणजे अनेकतेत एकता आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्वाचे साकार रुप असल्याचे दृश्य दिसत होते.

प्रविण छाब्रा, मीडिया प्रभारी, मुंबई

Sushil Kumar Josh

"उत्तराखण्ड जोश" एक न्यूज पोर्टल है जो अपने पाठकों को देश-विदेश, सरकारी, अर्धसरकारी, सामाजिक गतिविधियां, स्वस्थ्य, मनोरजंन, स्पोर्टस, फिल्मी, कहानी, कविता, व्यंग्य इत्यादि समाचार सोशल मीडिया के जरिये आप तक पहुंचाने का कार्य करता है। वहीं अन्य लोगों तक पहुंचाने या शेयर करने लिए आपका सहयोग चाहता है।

Leave a Reply